कराड – अल्पवयीन मुलीला बेशुद्ध करुन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या.के.एस. होरे यांनी बुधवारी ही शिक्षा सुनावली. सुलतान ऊर्फ तोफीक ईनायतुल्ला पटेल मूळ रा. वाघेरी, ता. कराड सध्या रा. विमानतळ, कराड) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत सरकार पक्षाकडून दिलेली माहिती अशी, दि. 9 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास सुलतान ऊर्फ तोफीक मुल्ला हा पिडीत मुलीच्या घरी गेला. त्याने त्या मुलीच्या बॅंक खात्यावर 1 लाख रुपये टाकून त्यापैकी 50 हजार रुपये काढून घेतले. या व्यवहारानंतर संबंधित मुलीशी त्याने जवळीक वाढवली. तो त्या मुलीला वारंवार भेटून लग्नाचे अमिष दाखवत होता. माझे वाळूचे ट्रक आहेत, असे त्याने मुलीला सांगितले होते. दरम्यान 22 डिसेंबर 2016 रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास सुलतान ऊर्फ तोफीक मुल्ला याने त्या मुलीच्या मोबाईलवर फोन करुन हायवेवर ट्रक घेऊन थांबलो असल्याचे सांगत भेटायला बोलवले. मुलीने नकार दिला असता त्याने तिला लग्नाचे तसेच प्रेमाचे अमिष दाखवले.
मुलगी त्याठिकाणी गेली असता त्याने तिला ट्रकच्या केबिनमध्ये घेऊन थंड पेय दिल्यामुळे मुलगी बेशुद्ध पडली. त्या अवस्थेतच त्याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबतची तक्रार पिडीत मुलीने तळबीड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव व व्ही.बी. पाटील यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. होरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्यावतीने ऍड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला 10 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.