माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे “कम्युनिटी रेडिओ चळवळीला समर्थन’ नावाची योजना
पुणे(प्रतिनिधी) : विविध विषयांवरील जनजागृतीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कम्युनिटी रेडिओंना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशभरात या रेडिओ स्थानकांची संख्या वाढविण्याबरोबरच त्यांचा जाहिरात प्रसारण कालावधी वाढविण्यासाठी लवकरच प्रस्ताव आणला जाणार असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले आहे.
मंत्रालयाच्या संपर्क अभियानांतर्गत देशभरातील 300 सामुदायिक रेडिओ केंद्रांना जावडेकर यांनी संबोधित केले. यावेळी सामुदायिक रेडिओ म्हणजे कम्युनिटी रेडिओ केंद्रे ही “परिवर्तनाचे पाईक’ आहे, अशा शब्दात कम्युनिटी रेडिओचे कयुकुक करत या रेडिओ केंद्राना अधिक सक्षम करण्यासाठी मंत्रालय विविध योजनांवर विचार करत असून, यामध्ये प्रामुख्याने रेडिओ स्थानकांची संख्या वाढविणे तसेच त्यांचा जाहिरात प्रसारण कालावधी वाढविण्याबाबत विचार केला जात आहे. सध्या कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटे आहे तर दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी तो 12 मिनिटे आहे. सर्व रेडिओ केंद्रांना समान वेळ देण्यास उत्सुक आहोत जेणेकरुन त्यांना निधी मिळविण्याची गरज भासू नये.
कम्युनिटी रेडिओला सहकार्य करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे “कम्युनिटी रेडिओ चळवळीला समर्थन’ नावाची योजना राबवित असून, त्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच एफएम रेडिओ वाहिन्यांवरून ज्या प्रकारे बातम्या दिल्या जातात त्याच प्रकारे कम्युनिटी रेडिओवर बातम्या प्रसारित करण्यासंबंधी आपण विचार करू असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, भारतात 290 कम्युनिटी रेडिओ केंद्र असून त्यातील 130 शैक्षणिक संस्थांद्वारे,143 सामाजिक संस्थांद्वारे तर 17 कृषी विज्ञान केंद्रांद्वारे चालविली जातात. ही कमी शक्तीची एफएम रेडिओ केंद्र असून 10-15 किलोमीटरच्या परिघात त्याचे प्रसारण ऐकता येते. तळागाळातील लोकांसाठीच्या संप्रेषणात बऱ्याचदा या केंद्रांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.