चंदीगढ – अजनाळा हल्ल्याप्रकरणी अमृतपाल सिंगच्या सात साथीदारांना अटक करण्यात आली आहे. कट्टरपंथी अमृतपाल सिंग आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी आणखी दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या असून शस्त्रास्त्र कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आल्याचे अमृतसरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सतींदर सिंग यांनी सांगितले.
अजयपाल, गुरवीर सिंग, बलजिंदर सिंग, हरमिंदर सिंग, गुरलाल सिंग, सुवीरित सिंग आणि अमनदीप सिंग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सतींदर सिंग म्हणाले, आम्ही शनिवारी रात्री शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत नवीन तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अमृतपाल हा मुख्य आरोपी असून नवीन तक्रारीनुसार त्याचे सातही साथीदार आरोपी आहेत. पोलिसांनी शनिवारी अमृतपालवर मोठी कारवाई करताना त्यांच्या संघटनेच्या 78 सदस्यांनाही अटक केली होती. या प्रकरणात अमृतपाल अजूनही फरार आहे.
राहुल गांधींनी लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या – जे. पी. नढ्ढा
23 फेब्रुवारीला झालेल्या अजनाळा घटनेप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार अमृतपालच्या साथीदारांपैकी सात साथीदारांना शनिवारी संध्याकाळी जालंधरमधील मेहतपूरजवळ अटक करण्यात आली. या आरोपींकडून सहा अवैध 12 बोअरच्या बंदुका आणि 193 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यापैकी हरमिंदर सिंगकडे एक बंदुक आणि 139 काडतुसेसह जप्त करण्यात आली. त्याची चौकशी केली असता अमृतपालने गुरबेज नावाच्या व्यक्तीकडून ही काडतुसे मिळवली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.