मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ इच्छित होते. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून थांबवल्याचा दावा एका प्रख्यात माध्यमाने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सूरतमध्ये गेले होते त्याच दिवशी उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राजीनामा देत याची घोषणा करणार होते. पण शरद पवारांनी त्यावेळीही उध्दव यांना रोखले होते असे सूत्रांचे म्हणणे आहे.
उद्धव ठाकरे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा करण्याआधी शरद पवारांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. यामुळेच उद्धव ठाकरेंचे फेसबुक लाइव्ह अर्धा तास उशिरा सुरु झाले होते, असा दावाही करण्यात आला आहे. तुम्हाला जर मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर तुम्ही स्वत: समोर येऊन सांगावे आणि माझा राजीनामाही राज्यपालांकडे घेऊन जावा असे मुख्यमंत्री तेव्हा म्हणाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान त्याच दिवशी सोडले होते.