भाजप शहराध्यक्षपदासाठी अमोल थोरात यांचे नाव चर्चेत

पिंपरी  – पुणे शहराच्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही भाजप शहराध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, विधानसभा निवडणूक होईपर्यंत आमदार लक्ष्मण जगताप यांचे शहराध्यक्षपद कायम राहणार आहे. त्यानंतर शहराध्यक्ष बदलाचा निर्णय घेतला जाणार असून त्यासाठी निष्ठावंत मानले जाणारे अमोल थोरात हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे.

हे यश मिळविण्यामध्ये भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हुकूमी एक्का ठरले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुण्याचे शहराध्यक्ष बदलले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातही शहराध्यक्ष बदलाच्या हलचाली सुरू झाल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही नावांची चाचपणी केल्याचे समजते. यामध्ये पक्षाचे शहर संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांच्यासह काही नावे चर्चेत होती. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष बदल करण्याऐवजी निवडणुकीनंतर अध्यक्ष बदलाचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सत्ता कायम टिकवून ठेवण्याचे आव्हान पेलणाऱ्या नेतृत्वाला संधी दिली जाणार आहे. यामध्ये अमोल थोरात यांचे नाव आघाडीवर आहे. तरुण चेहरा असलेले अमोल थोरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील विनायक थोरात यांच्यापासून त्यांना संघातील कार्याचा वारसा आहे. भाजप विरोधी पक्षात असताना पक्ष बांधणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. पक्षाच्या सदस्य नोंदणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्यावतीने युतीमध्ये शहर समन्वयक म्हणून थोरात यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. आमदार जगताप यांच्या विश्‍वासातील सहकाऱ्यांपैकी ते एक मानले जातात. त्यामुळे त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या नावाला निष्ठावंत गटाने हिरवा कंदील दाखविल्याने अध्यक्षपदी त्यांचीच निवड होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)