पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, विरोधी पक्षनेते अजित पवार इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
तसेच, यंदाच्या शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळयाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील विशेष हजेरी लावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता सर्व यंत्रणाकामाला लागली असून, भाजपकडून देखील या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु आहे.
येत्या 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यामुळे या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त असणार आहे. पुण्यात 18 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुपारी पुण्यात येणार आहे.
त्यानंतर ते पुण्यात मुक्काम करतील आणि 19 फेब्रुवारीला सकाळी शिवसृष्टीचे लोकार्पण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिवनेरी किल्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.