नवी दिल्ली – देशाच्या राजकारणात सर्वाधिक गाजलेला चारा घोटाळा उघड करून बिहारचे मत्तबर नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना तुरुगांपर्यंत पोहोचविणारे माजी आयएएस अधिकारी अमित खरे यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मोठी जबाबदारी दिली आहे.
अमित खरे यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेटने नियुक्त केलेल्या समितीने आज याला मंजुरी दिली आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लॉन्च केलेल्या शैक्षणिक धोरणांमध्ये अमित खरे यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे.
अमित खरे उच्च शिक्षण सचिवपदावरून गेल्या वर्षी 30 सप्टेबर रोजी निवृत्त झाले आहेत. आता ते पुढील दोन वर्षे मोदींचे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.
अमित खऱे हे 1985 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षांच्या कारकिर्दीत बिहार आणि झारखंडमध्ये अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पाडल्या. त्यांनी चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.