मंचर, (प्रतिनिधी) – येथील एसटी बस स्थानकावर एसटी प्रवासासाठी आवश्यक असणारे तिकीट आगाऊ आरक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याची माहिती मंचर एसटी आगाराचे आगारप्रमुख बालाजी सूर्यवंशी यांनी दिली.
मंचर एसटी बस स्थानकावर तिकीट आरक्षण सुविधा तीन महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होतं होती.त्यामुळे येथील प्रवाशांना तिकीट आगाऊ आरक्षण करिता नारायणगाव अथवा राजगुरूनगर येथे जावे लागत असल्याने प्रवाशांनी तीव्र स्वरुपात नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांनी या प्रकरणासंदर्भात विशेष लक्ष घातल्यामुळे एसटी प्रशासन खडबडून जागे झाले.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष भोर, अवसरीचे माजी उपसरपंच दिनेश खेडकर आणि मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुहास बाणखेले यांनी तांबडेमळा मंचर एसटी आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी यांची भेट घेऊन प्रलंबित सुविधांबाबत चर्चा करून कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानुसार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहायक रामदास वळसे पाटील यांनी विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून मंचर एसटी आगार सुरू होऊन अद्याप डीझेल पंप सुरू झाला नसल्याचे सांगितले.
मंचर एसटी आगारा संदर्भात प्रवाशांच्या अडचणी असल्यास त्यांनी थेट तांबडेमळा मंचर एसटी आगारात येऊन समस्या सांगाव्यात. त्यानुसार प्रवाशांच्या अडचणी सोडवल्या जातील, अशी माहिती आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी यांनी दिली.
चार्जिंग स्टेशनबाबत एसटी विभागाने रीतसर पैसे भरले आहेत. तसेच डीझेल पंप मंजूर झाला असून लवकरात लवकर डीझेल पंप सुरू होईल.- कैलास पाटील, वरिष्ठ अधिकारी, एसटी
तांबडेमळा मंचर एसटी आगाराच्या आवारातील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम प्रोसेसमध्ये आहे. त्याबाबत लवकरच काम सुरू करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.- आर. वाय. पाटील, कार्यकारि अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
मंचर एसटी आगारातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा सुरू आहे. तसेच पुणे नाशिक रस्त्यावरील धावणार्या एसटी बसेस मंचरएसटी बस स्थानकात चालकांनी आणावी. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी सुलभ व्यवस्था होईल.अन्यथा प्रवाशांची तक्रार उद्भवल्यास कारवाई केली जाईल.- बालाजी सूर्यवंशी, आगार प्रमुख, मंचर