– ज्ञानेश्वर फड
आळंदी – करोनाच्या साथीच्या संकटामुळे वारकऱ्यांनी आपल्या घरी राहुनच दररोज काकड आरती, ग्रंथांचे पारायण, हरिपाठ करावा. मनाने पंढरपूरात जाऊन चंद्रभागा स्नान करावे, पांडुरंगाचे दर्शन घ्यावे. यंदा वारकऱ्यांनी मानसवारी करावी, असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्रीगुरू आंबेकर उर्फ आजरेकर दिंडी प्रमुख ह.भ.प. भागवत महाराज चवरे यांनी केले.
चवरे महाराज यांच्याशी आषाढी वारी सोहळ्यानिमित्त दिंडी आणि वारी या विषयावर दै. प्रभातने संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, करोनामुळे गेली दोन वर्षे वारकऱ्यांना वारीला येता आले नाही. पांडुरंगाला भेटता आले नाही. मात्र, आम्ही सर्व वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून वारी प्रत्यक्ष पार पाडत आहेत. गेल्यावर्षी दशमी, द्वादशी, एकादशीला आम्ही दोघा-तिघांत कीर्तन, भजन करून सोहळा पार पाडला. यंदाही अशाच पद्धतीने आषाढी वारी सोहळा पार पडेल. करोना हा संसर्गजन्य रोग असल्याने आपल्यामुळे इतरांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे वारकऱ्यांनी यंदा आपल्या घरूनच मानसवारी करावी.
श्रीगुरू आंबेकर उर्फ आजरेकर फड दिंडीचा इतिहास आणि परंपरा
श्रीगुरू आंबेकर उर्फ आजरेकर फड दिंडी ही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथामागे 26 क्रमांकाची मानाची दिंडी आहे. 1942 मध्ये या दिंडीला क्रमांक मिळाला. मात्र, या दिंडीला 200 वर्षांची परंपरा आहे. या घराण्याचे मुळ पुरूष श्रीगुरु बाबासाहेब महाराज आजरेकर यांचे शिष्य हनुमंतराव बाबा चवरे यांनी वारी सुरू केली. सुरुवातीला ते जीवचीवाडी (ता. केज, जि. बीड) येथून दर महिन्याच्या वारीला आठ वारकऱ्यांसोबत दिंडीत चालत पंढरपूरला येत असत. त्यानंतर हनुमंतरावबाबा यांचे चिरंजीव नामदेवबाबा यांनी ही परंपरा पुढे सुरु ठेवत आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात एक क्रमांकाच्या दिंडीसोबत चालत असत. त्यानंतर काही वर्ष नामदेवबाबा आणि रंगनाथबाबा रथापाठीमागे सात क्रमांकाच्या दिंडीत चालले.
1942 मध्ये दिंडीला स्वतंत्र स्थान मिळाले आणि तेव्हापासून पंढरीनाथबाबा चवरे, वासुदेव महाराज यांनी परंपरा पुढे सुरु ठेवली. सध्या भागवत महाराज चवरे हे दिंडीप्रमुख आहेत. दिंडीत प्रामुख्याने मराठवाडा तसेच मुंबईतील 400 ते 450 भाविक असतात. 200 वर्षांपासून आषाढी पौर्णिमेला देवाच्या पादुकांची पूजा करून त्या पादुका घेऊन प्रदक्षिणा करण्याचा मान आंबेकर आजरेकर दिंडीकडे आहे. त्याचबरोबर आषाढी पौर्णिमा झाल्यानंतर देवाच्या प्रक्षाळ पुजेच्या आधीच्या दिवशी पाच तास गरुड खांबाजवळ जागराच्या सेवेचा मान देखील आंबेकर आजरेकर दिंडीकडे आहे.
वारी असती तर… आजचा मुक्काम – सासवड