श्रीनगर – खराब हवामानामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा मार्गासह काश्मीरमधील बहुतांश भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. खराब हवामानामुळे पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरील यात्रा दुसऱ्या दिवशी थांबवण्यात आली आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यामुळे यात्रेकरूंच्या ताज्या तुकड्यांना जम्मूहून त्यांच्या पुढील यात्रेला जाण्यास परवानगी देण्यात आली नाही.
पावसामुळे दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प झाला होता. शुक्रवार पासूनच भाविकांना बालताल आणि नुनवान बेस कॅम्प येथे थांबवण्यात आले आहे.यात्रेच्या बालताल मार्गावरही दरडी कोसळण्याचा प्रकार घडला आहे. हवामान सुधारल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आत्तापर्यंत 80,000 हून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेत दर्शन घेतले आहे. ही यात्रा 31 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.