पिंपरी – तक्रार देण्यासाठी आलेली एक महिला आणि तिच्या सोबत आलेला पुरूष सहकारी यांनी एकामागोमाग तक्रारींचा पाढा वाचला. प्रत्येक जनसंवाद सभेत येत असल्याचेही ती महिला सांगत होती. मात्र महापालिकेने केलेले चांगलं कामही सांगा, असा सवाल अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केला. आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत एक वाक्य चांगल सांगून महिलेने पुन्हा तक्रारींचा पाढा सुरू केल्याने उपस्थित अधिकाऱ्यांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली.
ब क्षेत्रीय कार्यालयात सोमवार जनसंवाद सभा झाली. त्यावेळी काळेवाडीतून आलेली एक महिला आणि तिच्यासोबत असलेल्या पुरूष सहकारी यांनी तक्रारींचा कागद पुढे केला आणि तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. यापूर्वी केलेल्या तक्रारीवर उपस्थित अधिकारी उत्तर देत होते. त्यानंतर लगेच दुसरा प्रश्न संबंधित महिलेकडून विचारला जात होता. एकामागोमाग जवळपास सात आठ समस्या मांडल्यानंतर अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी संबंधित महिलेला “महापालिकेने केलेली काही चांगली कामेही सांगा, असे म्हणाले. त्यानंतर आरोग्य विभागाचे काम चांगले असून तक्रार केल्यावर त्वरीत कार्यवाही होते, असे त्या महिलेने सांगितले. त्यानंतर लगेचच पुन्हा तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरवात केली.
ठेकेदार आम्हालाच वीज, पाणी मागतात
सार्वजनिक ठिकाणी काम करताना ठेकेदार नागरिकांकडून कामासाठी पाणी आणि वीज कनेक्शन घेतात. सध्या आम्हालाच पाणी पुरत नाही तर ठेकेदाराला कुठून देणार, असा सवालही एका महिला तक्रारदाराने उपस्थित केला. तसेच सहकार्य न केल्यास काम करीत नसल्याचीही कैफियत त्या महिलेने मांडली.
लाकडावर अंत्यसंस्काराची सोय करा
चिंचवड येथे स्मशानभूमीचे काम संथ गतीने सुरू आहे. त्याठिकाणी विद्युत दाहिनीसह लाकडावर अंत्यसंस्काराची सोय करा, अशी मागणी एका महिलेने केली. मात्र ही मागणी मान्य होणार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले. तसेच विद्युत दाहिनी एका महिन्यात सुरू होईल, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले.
…म्हणून दुसऱ्यांना तक्रार करण्यास सांगतो
शहरातील समस्यांबाबत मी वारंवार सारथीवर तक्रार देत असतो. माझ्या तक्रारी एवढ्या झाल्या आहेत की मी आता दुसऱ्यांना सारथीवर तक्रार करण्यास सांगतो, असे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. तसेच सारथीवर तक्रार केल्यावर महापालिकेचे अधिकारी वारंवार फोन करून तक्रारीच्या ठिकाणाबाबत विचारणा करीत असून त्यामुळे आम्हाला त्रास होत असल्याचेही सांगितले.