पिंपरी -आजाराचे योग्य निदान न करता उपचार केले. उपचारांमध्ये केलेल्या हयगयीने व निष्काळजीपणामुळे पोलिसाची पत्नी असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू झाला. याप्रकरणी ससूनमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर संबंधित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल नगर, जगताप डेअरी येथे हा प्रकार घडला.
मंजुषा ज्ञानेश्वर पिंगळे उर्फ मंजुषा संतोष भागवत (वय 43) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. डॉ. प्रदीप एच. पाटील याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संतोष तुकाराम भागवत (वय 48, रा. जगताप डेअरी, पुणे) यांनी या प्रकरणी रविवारी (दि. 10) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 1 ते 3 सप्टेंबर 2018 या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादी संतोष भागवत हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेत पोलीस हवालदार आहेत.
मंजुषा या फिर्यादी भागवत यांच्या पत्नी होत्या. मंजुषा यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना 1 सप्टेंबर 2018 रोजी उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी मंजुषा यांना न्युमोनिया झालेला असताना डॉ. प्रदीप पाटील याने आजाराचे योग्य प्रकारे निदान केले नाही. निष्काळजीपणाने मनाला वाटेल तसे उपचार केले. त्यानंतर 4 सप्टेंबर 2018 रोजी मंजुषा यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यामुळे फिर्यादीने त्यांना पुढील उपचारासाठी थेरगाव येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मंजुषा यांचा 5 सप्टेंबर 2018 रोजी मृत्यू झाला. न्युमोनियाच्या आजाराने मंजुषा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चौकशी करून पोलिसांनी याप्रकरणी साडेतीन वर्षांनंतर गुन्हा दाखल केला.
==========