वाघोली (प्रतिनिधी) : सध्या कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. तर दुसरीकडे कडक लॉकडाउन चे अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस यंत्रणा रस्त्यावर अहोरात्र उभी आहे. यात पोलिस व आरोग्य कर्मचारी यांचे देखील आरोग्य धोक्यात येऊ शकते यासाठी त्यांच्या आरोग्याचा देखील विचार करण्याची गरज असून नागरिकांनी त्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन पुणे जिल्हा युवा मोर्चा भाजपचे संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी केले आहे.
जिल्ह्यात सध्या खाजगी तसेच शासकीय कोविड-19 सेंटर अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र याच काळात लॉक डाऊन च्या कडक नियमांचे अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी करून पोलीस बांधव रस्त्यावर उभे राहून नागरिकांची चौकशी करून त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मोलाची कामगिरी बजावत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच नागरिकांना आरोग्यदायी सवयी लागण्यासाठी व अत्यावश्यक सेवे करताच केवळ बाहेर पडण्यासाठी नागरिकांना एकमेव बंधने घालणारी म्हणून पोलिस यंत्रणा ओळखली जात आहे. या पोलिस बांधवांचे देखील आरोग्य नाका-बंदी दरम्यान धोक्यात येऊ शकते याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांनी ठेवून अत्यावश्यक सेवे करताच आणि योग्य त्या कारणासाठीच बाहेर पडण्याचे आवाहन सातव यांनी केले आहे.
याशिवाय जिल्ह्यातील ठीक ठिकाणी लसीकरणाचे वेग वाढवला जात असताना या लसीकरण केंद्रावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. काही ठिकाणी टोकन पद्धत तर काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित अंतरावर उभे करून लसीकरण मोहीम राबवली जात आहे याच लसीकरण केंद्रावर काम करणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे देखील आरोग्य वाढत्या गर्दीमुळे धोक्यात येऊ शकते. यामुळे नागरिकांनी त्यांच्याशी वाद विवाद न करता योग्य त्या सुरक्षित अंतरावर व योग्य त्या वेळेत लसीकरण करून घेऊन त्यांना सहकार्य करावे असे आवाहन सातव यांनी केले आहे.