‘घरात अन्नाचा कणही नाही’, घरकाम करणाऱ्या महिलेची कहाणी ऐकून पोलिसांचेही डोळे पाणावले; केली मदत

औरंगाबाद – करोना संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाॅकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. हातावर पोट असणाऱ्या लोकांची पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण सुरु झाली आहे. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची स्थिती तर आणखीच बिकट आहे. हातावर पोट असलेल्यांचे या लाॅकडाऊनमुळे काय हाल होताहेत याचे चित्र स्पष्ट करणारी घटना औरंगाबाद येथे घडली आहे.

घरात अन्नाचा एकही कण नसल्याने तडफडून मरण्यापेक्षा घरकाम करणाऱ्या महिलेने आपल्या मुलांना घेऊन थेट पोलिस स्टेशन गाठले. साहेब मला मदत नकोय, फक्त काम द्या, माझ्या घरात अन्नाचा एक कणही उरला नाही, अशा शब्दात महिलेने मदत मागितल्यानंतर पोलिसांचेही डोळे पाणावले.

संबंधित महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तेव्हापासून घरकाम करून तीन मुलांचा उदरनिर्वाह भागवत होती. मात्र, लाॅकडाऊनमुळे काम सुटले आणि जीवन जगणे कठीण झाले. मागील काही दिवसांपासून किराणा आणण्यासाठीही या महिलेकडे पैसे राहिले नाही. त्यामुळे तीने थेट पोलिस ठाणे गाठत पोलिसांकडे जाऊन आपली कहाणी सांगितली.

घरकाम करून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणाऱ्या या महिलेची पोलिसांनी मदत केली आहे. त्यांनी वर्गणी करून महिलेला 45 किलो किराणा घेऊन दिला आहे.् तसेच काम मिळवून देण्याची हमीही पोलीसांनी दिली आहे. शिवाय रिक्षा करून त्या महिलेला घरी सोडण्याची व्यवस्था केली. पोलिसांच्या या कर्तव्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.