दिवंगत मित्रांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप

ढेबेवाडी  – आपण समाजाचं काही तरी देणं लागतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजवली पाहिजे. हेच धोरण मालदन, ता. पाटण येथील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलच्या सन 1993 च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्याच माजी दिवंगत मित्रांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून मित्रांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मालदन, ता. पाटण येथील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल मधील सन 1993 च्या दहावीच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी यावर्षी एकत्र येत व्हॉट्‌सऍपचा एक ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून बऱ्याच वर्षानंतर एकत्र आलेले मित्र-मैत्रिणी एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण करु लागले.

यातूनच आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. ही भावना या ग्रुपमध्ये रुजू लागली. यावेळी प्रत्येकानी वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचे विचार ग्रुपवर मांडले. यातून काहींनी आपल्याच बॅचमधील काही दिवंगत झालेल्या मित्र-मैत्रिणींच्या कुटुंबीयाला हातभार लावण्याची कल्पना मांडली. सर्वांनी ही कल्पना मूर्त स्वरुपात आणण्याचे ठरविले.

नव्या-जुन्या आठवणींचे आपल्या आयुष्यात घडलेले प्रसंग एकमेकांशी हितगुज करतच आपल्याच वर्गात शिकलेल्या मात्र हयात नसलेल्या मित्रांच्या मुलांना शालेय साहित्य देण्याचे ठरवून शालेय साहित्याचे वाटप करीत दिवंगत मित्रांच्या आठवणींना उजाळा दिला.

या उपक्रमात दादासो माने, दत्ता कारंडे, संजय चव्हाण, अजित काळे, संदीप काळे, वर्षा तावरे, पुष्पा गरूड, मंदार कदम, रविंद्र माने, दिलीप पाचपुते, धनंजय काळे, विमल महाडीक, दिलीप जाधव यांनी सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.