पुणे – पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान; निवडणूक विभाग सज्ज

3 जागांसाठी होणार प्रक्रिया

पुणे – महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट 11 गावे आणि प्रभाग क्रमांक 1 मधील रिक्‍त जागांसाठी रविवारी पोटनिवडणूक होत आहे. या तीन जागांसाठी सुमारे 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, या निवडणूक प्रचारासाठीची सांगता शुक्रवारी सायंकाळी झाली.

महापालिकेतील 11 गावांसाठीचा हा प्रभाग सर्वांत मोठा असणार असून शहराच्या चार दिशांना तो विखुरलेला असल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. कळस-धानोरी प्रभाग क्र. 1 अ, आणि समाविष्ट 11 गावांचा नव्याने झालेला प्रभाग क्र. 42 च्या नगरसेवक पदाच्या दोन जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात प्रभाग क्र. 1-अ मध्ये भाजप-शिवसेना युतीच्या ऐश्‍वर्या जाधव, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या रेणुका चलवादी आणि वंचित आघाडीच्या रोहिणी टेकाळे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. याठिकाणी भाजपमध्येच बंडखोरी झाली आहे. त्यामुळे ही जागा राखणार, की त्याठिकाणी वेगळा निकाल लागणार? याबाबत उत्सुकता आहे. तर प्रभाग क्र. 42 अ च्या जागेसाठी शिवसेना पुरस्कृत अपक्ष अमोल हरपाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश ढोरे, तर ब जागेसाठी युतीच्या आश्‍विनी पोकळे आणि राष्ट्रवादीच्या भाग्यश्री कामटे अशी सरळ लढत होणार आहे.

सोमवारी मतमोजणी
या पोटनिवडणूक मतदानांनंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी (सोमवारी) मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या पूर्ण करण्यात आलेल्या असून त्यांना शनिवारी साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.