विधानसभेला युतीचा 50-50चा फॉर्म्युला – दानवे

पिंपरी – लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षात युती होणार आहे. आमच्यात निम्म्या-निम्म्याचा फॉर्म्युला ठरला असून निवडणुकीत विधानसभेवर भगवाच फडकेल, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केला.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्‌घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सोमवारी (दि.10) झाले. त्यानंतर संत तुकारामनगर येथे दानवेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले. त्यामुळेच घवघवीत यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची युती होणार आहे. आमचा निम्म्या-निम्म्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपा -सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन आम्ही जागा वाटपा संदर्भात निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य असलेल्या 228 विधानसभा मतदार संघात भगवा फडकेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

माझ्या इंग्रजीचा वेगळा अर्थ काढतात

अर्जुन खोतकर आणि माझ्यात झालेल्या चर्चेबद्दल मी बोललेलो “सेटलमेंट’चा विषय प्रसारमाध्यमांनी चांगलाच लावून धरला. माझ्या इंग्रजीचा चुकीचा अर्थ लावत बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे मी इंग्रजीचा वापर करणार नाही, असे दानवे यांनी सांगितल्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.