शहरातील दोन्ही आमदारांबाबत खासदार बापट यांचे वक्तव्य
पिंपरी – पिंपरी येथे झालेल्या एका कार्यक्रमात खासदार गिरीश बापट यांनी स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या भांडणाचा जाहीर उल्लेख केला आणि या भांडणांना प्रेमाची भांडणे असे संबोधून हशा पिकवला.
कार्यकर्त्यांना राजकीय तडजोडीचा सल्ला देताना ते म्हणाले, राजकीय जीवनात प्रदीर्घ पल्ला गाठायाचा असल्यास अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्यासाठी संयम महत्वाचा आहे, असे सांगत आमदार जगताप आणि लांडगे यांच्यात होणाऱ्या भांडणाचा संदर्भ देत, सकाळी भांडण झाले की, रात्री नाही, संध्याकळी ते पुन्हा एकत्र बसायचे. सुरुवातीला मी देखील बुचकळ्यात पडायचो. मात्र, त्यामुळे ही भांडणे प्रेमाची आहेत, हे समजण्यासाठी साडे चार वर्षे लागली.
खासदारपदी निवड झाल्यानंतर शहर भाजपच्या वतीने गिरीश बापट यांचा तलवार देउन सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. संत तुकारामनगरमधील आचार्य अत्रे रंगमंदीरात रविवारी (दि.10) हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यसभा सदस्य अमर साबळे, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, योगेश टिळेकर, माजी आमदार बबनराव भेगडे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, नगरसेवक नितीन काळजे, केशव घोळवे, रवी लांडगे, नगरसेविका सीमा सावळे, आशा धायगुडे, उमा खापरे, शैला मोळक आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात बापट म्हणाले की, बारामतीच्या पवार घराण्याला घरी बसविण्याचे काम पिंपरी-चिंचवड शहराने केले. ती काळाची गरज होती. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. सदाशिव खाडे यांनी प्रास्ताविक केले. अमोल थोरात यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद निसळ यांनी आभार मानले.
महापौरांच्या आडनावाचा भलताच नामोल्लेख
या सत्कार सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी महापौर राहुल जाधव यांचा उल्लेख राहुल शेवाळे तर शैला मोळक यांचा उल्लेख शैला मोहोळ असा केला. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. तर एखाद्या पदासाठी भाजपमधून रात्री साडे बारानंतरच फोन येऊ शकतो, असे सूचक विधान दानवे यांनी केले.
जगताप, लांडगेंना कसा डाव टाकला : दानवे
आपल्या भाषणात रावसाहेब दानवे यांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या भाजपमधील प्रवेशाबद्दल ते म्हणाले की, आम्ही या दोघांना हेरलं होते, तेच आमचं काम होतं. आणि मग कसा डाव टाकला, असे सांगत त्यांच्या भाजपप्रवेशाची माहिती जगजाहीर केली. मात्र नेमका डाव कोणता होता हे मात्र दानवे यांनी गुलदस्त्यात ठेवले.