मुंबई – राज्यभरात गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. मात्र आत बाप्पाला निरोप देण्याची वेळ देखील जवळ आली आहे. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आज सात दिवसांच्या गणपती बाप्पाला देखील निरोप दिला जात आहे. बाप्पाला निरोप देताना चिमुकल्यांसह सर्वचजण भावूक होतात. अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) देखील पाच दिवसांनंतर लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बाप्पासाठी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
श्रेयाची पोस्ट –
“काल ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ असे म्हणत तुझा निरोप घेतला आणि नेहमी सारखे अश्रू अनावर झाले. गेल्या इतक्या वर्षात ह्या 5 दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना काही मागितल्याचं मला आठवत नाही. पण एक सांगेन ह्या 5 दिवसात तुझ्या येण्याने जेवढा आनंद मला मिळतो तो मला कधीच शब्दात मांडता येणार नाही. तुझ्या निमित्ताने सगळी माझी प्रेमाची माणसं एकत्र येतात, तुझं कौतुक करतात, तेव्हा मनाला होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. हि प्रथा वर्षांनुवर्षे अशीच चालू ठेव. तुझी सेवा करायची संधी आम्हाला देत राहा !
View this post on Instagram
विसर्जन फक्त म्हणायला रे , बाकी माझ्यासोबत तू असतोसच कि …कायम दिसत राहतोस ..कधी कामात ,कधी माणसांमध्ये.. माझ्यावर अतोनात निःस्वार्थ प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत..आणि हा तू मला दिलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे . Mumma म्हणते तसं “जाते नाही येते म्हणावं गं ” मग आता ..ये लौकर पुढच्या वर्षी आनंदाने … तुला सगळ्यासाठी खूप THANK YOU! आणि एक घट्ट मिठी (तुला तर माहितीये आपलं) सुखी राहा ! आनंदात राहा ..तुला खूप prem.. भेटूच,” असे श्रेयाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
श्रेयाची ही भावनिक पोस्ट अनेकांच्या पसंतीस पडली आहे. काही नेटकऱ्यांनी ‘खूप छान लिहिलं आहे’ असे म्हणत तिचे कौतुक केले आहे. दरम्यान, श्रेया बुगडे छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे घराघरात पोहचली आहे. या शोच्या माध्यमातून ती अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करते.