वॉशिंग्टन – पृथ्वीवर एलियन म्हणजेच परग्रहवासीयांचे अतस्तित्व आहे की नाही याबाबत नेहमीच चर्चा सुरू असते आता अमेरिकेतील एका प्रोफेसरच्या दाव्याने खळबळ माजली आहे. या प्रोफेसरने दिलेल्या माहितीप्रमाणे परग्रहवासी म्हणजेच एलियन्स सर्वसामान्य नागरिकांमध्ये वावरत असून पृथ्वीवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत ते आहेत.
डॉक्टर डेव्हिड जेकब असे या प्रोफेसरचे नाव असून परग्रहवासीयांच्या हल्ल्यातून बचावलेल्या अनेक नागरिकांच्या मुलाखती घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. डॉक्टर डेव्हिड जेकब यांनी या विषयावर अनेक पुस्तके लिहिली असून त्यांनी प्रत्येक पुस्तकात साधारण याच प्रकारचे दावे केले आहेत. परग्रहवासीयांना पाहिलेल्या किंवा परग्रहवासीयांनी हल्ला केलेल्या अनेक लोकांच्या मुलाखती त्यांनी या पुस्तकांमध्ये प्रकाशित केल्या आहेत.
डेव्हिड जेकब अमेरिकेतील टेम्पल युनिव्हर्सिटीमध्ये शिकवण्याचे काम करत असून या विषयातील ते तज्ञ मानले जातात आपले ताजे निष्कर्ष त्यांनी एका लघुपटाच्या माध्यमातून प्रकाशित केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये परग्रहवासी वावरत असल्याची पुष्टी त्यांनी या लघुपटात केली आहे. पृथ्वीवर कब्जा मिळवण्याचा तयारीत परग्रहवासी असून ते मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहेत असेही डॉक्टर डेव्हिड जेकब यांनी म्हटले आहे.
परग्रहवासीय पृथ्वीवरील नागरिकांच्या मेंदूचा ताबा घेण्याच्या तयारीत असून गेल्या काही वर्षांमध्ये गूढ पद्धतीने अपहरण झालेल्या अनेक लोकांचे अनुभवही डॉक्टर डेव्हिड जेकब यांनी मुलाखतीच्या माध्यमातून या लघुपटात मांडले आहेत. त्यांचे अपहरण परग्रहवासीयांनीच केले होते असा डॉक्टर डेव्हिड जेकब यांचा दावा आहे. अपहरण केलेल्या काही लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे उडत्या तबकड्यामध्ये जे परग्रहवासी दिसून आले होते ते दिसायला सर्वसामान्य पृथ्वीवरील नागरिकांसारखेच होते.