बुडापेस्ट (हंगेरी) – टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत इस्राएली खेळाडूशी खेळण्यास नकार देण्याचा निर्णय अल्जेरियाच्या ज्युडोपटू फेथी नुरिनसह त्याच्या प्रशिक्षकावर दहा वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युदो महासंघाने ही कारवाई केली.
इस्राएली खेळाडूशी खेळण्यास नकार देण्याची नुरिनची ही काही पहिली वेळ नाही. त्याने 2019 जागतिक स्पर्धेतूनही याच कारणामुळे माघार घेतली होती.दरम्यान त्यांना 23 जुलै 2031पर्यंत आंतरराष्ट्रीय ज्युडो महासंघाच्या कुठल्याही स्पर्धेत खेळता येणार नाही. या निर्णयाला क्रीडा लवादाकडे दाद मागण्याची त्यांना परवानगी आहे.
फेथीला 73 किलो वजन गटात पहिल्या फेरीत सुदानच्या मोहमद अब्दलरसूलशी खेळायचे होते. ही लढत जिंकल्यावर त्याची गाठ इस्राएलच्या तोहर बुटबुलशी पडणार होती. मात्र, पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्याच्या इस्राएलच्या कृतीचा निषेध करताना त्याने ही लढत खेळण्यास नकार दिला होता. त्या वेळी अल्जेरियन ऑलिंपिक संघटनेने तातडीने कारवाई करताना नुरीनसह त्याच्या प्राशिक्षकाचे अधिस्विकृती कार्ड रद्द करून त्यांची मायदेशी पाठवणी केली होती.
खेळाडूने व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून एखाद्या राजकीय भूमिकेचा निषेध करणे आम्ही समजू शकतो. पण, यासाठी नुरीन याने निवडलेले व्यासपीठ आणि वेळ चुकीची होती, असे सांगत आंतरराष्ट्रीय ज्युडो महासंघाने या दोघांवर तात्पुरती 10 वर्षांची बंदी घातली. त्यांची कृती ही ऑलिंपिक चळवळीचा आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचा भंग करणारी होती, असे महासंघाने कारवाई करताना स्पष्ट केले आहे.