लंडन :- इंग्लंडचा स्टार फलंदाज ऍलेक्स हेल्सने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आगामी एकदिवसीय विश्वकरंडकाच्या दोन महिने आधी हेल्सने हा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा तो सदस्य होता. हेलने त्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. हेल्सने भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातदेखील धडाकेबाज कामगिरी केली होती, ज्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
34 वर्षीय ऍलेक्स हेल्सने ऑगस्ट 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 156 सामने खेळले. हेलने एकूण सात शतकांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. यासह टी-20 फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला इंग्लिश क्रिकेटर होता. 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती.
निवृत्तीची घोषणा करताना हेल्स म्हणाला, “तिन्ही फॉरमॅटमध्ये 156 सामन्यांमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी काही आठवणी आणि काही मैत्र आयुष्यभर टिकवून ठेवले आहेत तरी मला आता आयुष्यात पुढे जावे असे वाटत आहे. हा एक अविश्वसनीय प्रवास होता.’