आळंदी –आळंदी देवाची येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते एम. डी. पाखरे हे आपल्या पत्रकारितेच्या कार्यक्षेत्रात गेली तीस वर्षांपासून कार्यरत आहेत. सामाजिक बांधीलकीतून अंध-अपंग यांच्यासाठी त्यांनी 21 जानेवारीपासून मोफत सेवा सुरू केली. या सेवेतून एका बेपत्ता व्यक्तीला त्याचे नातेवाईक 24 तासांत मिळाल्याचे पाखरे यांनी सांगितले.
रविवारी (दि. 23) ही अपंग, अर्धांगवायू झालेली व्यक्ती रस्त्यावर त्यांच्या निदर्शनास आली. त्यास बोलता येत नव्हते. बाबा कोठे जायचे? असे विचारले असता त्यांनी एका हाताने इशारा केला. त्यावेळी त्यांना रिक्षामध्ये बसवत त्यांनी केलेल्या इशाऱ्यानुसार इच्छित स्थळी नेले. त्यांना बोलता येत नसल्याने जास्त चौकशी झाली नाही. पण पाखरे यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी या बाबांचे फोटो काढले. सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश फिरवला.
काही तासांतच चाकण येथील गोविंदराव राऊत यांनी ही व्यक्ती चाकणमधील असल्याचे कळवले. रात्री दहा वाजता सदरील व्यक्तीच्या लहान भावाचा मला फोन आला, मी या बाबांचा लहान भाऊ नारायण भगवान वाघ आहे, तरी कृपया उद्या सकाळी आम्ही आळंदीमध्ये येतो व आमच्या व्यक्तीस तुम्ही शोध कार्य करण्यास मदत करा असे सांगितले.
आज सकाळी नऊ वाजता ते आळंदीत आले त्यांनी इंद्रायणी घाटावर शोध घेतला असता बाबा इंद्रायणी घाटाच्या कमानीमध्ये दिसून आले व त्यांनी आपल्या बंधूस रिक्षामध्ये बसून चाकण येथे सुखरुप घेऊन गेले. अंध अपंग व्यक्तीस रिक्षा मोफत या उपक्रमाचा श्री गणेशा दोन दिवसांपूर्वी केला आणि यातून आपल्या हातून हे चांगले सत्कार्य कामी आले, असे एम. डी. पाखरे यांनी सांगितले.