रोहित शेट्टीच्या “सूर्यवंशी’चे ट्रेलर रिलीज झाले आहे. आतापर्यंतच्या सगळ्या ऍक्शनपटांपेक्षा अक्षयने लय भारी स्टंट यामध्ये केल्याची झलक आपल्याला या ट्रेलरमधून बघायला मिळते. या सिनेमामध्ये अक्षयसाठी फारच कमी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे, असे स्वतः रोहित शेट्टीने सांगितले आहे. या सिनेमासाठी केले गेलेले स्टंट 20-30 वर्षांपूर्वीही केले गेले असल्याचे अक्षयने सांगितले आहे. आता असे स्टंट करण्याची अक्षयला सवयच झाली आहे.
एखाद्या लहान मुलाने डिज्नीलॅन्डमध्ये जावे, तितक्या सहजतेने तो स्टंट करत असतो. हे सारे स्टंट अगदी स्वतः केलेले असतात. व्हीएफएक्सच्या आधारे एखाद्या झीरोला हिरो सहज केले जाऊ शकते. मात्र अक्षयने अशा शॉर्टकटचा कधीही वापर केला नाही. आणखी 4-5 वर्षे तो असे ऍक्शन सीन करू शकेल. मात्र त्यानंतर तो ऍक्शन सिनेमे करणे बंद करणार आहे. वयानुसार त्याला ते थांबवावेच लागेल. “सूर्यवंशी’साठी अक्षयने 7-8 किलो वजन कमी केले आहे. त्याला ऍन्टी टेरर स्क्वॉडमधील अधिकाऱ्यासारखे दिसायचे असल्यामुळे त्याला हे करावे लागले.