पिंपरी – राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील धूसफूस सातत्याने बाहेर येत आहे. त्यामध्येच आता शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी भोसरीमध्ये बोलताना थेट अजित पवार यांनाच इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
अजितदादा आमचही ऐका, नाहीतर गडबड होईल, असा सूचक इशारा खासदार राऊत यांनी दिला. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये आपसांत मतभेद असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. त्यातच आता राऊत यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी येथे शिवसेनेकडून कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी राऊत यांनी हे विधान केले. राऊत म्हणाले, पालकमंत्री आपले नाहीत. राज्यात सत्ता आपली असली तरी या भागात आपले कोणी ऐकत नाही असे म्हणतात. मात्र असे होता कामा नये.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांच सर्व ऐकतात. आपण त्यांना सांगू दादा आमचंही ऐकल तर बर होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत, गडबड होईल, असा थेट इशाराच राऊत यांनी दिला.
मात्र, आपली टिपन्नी थोडी बोचरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावर राऊत यांनी तातडीने खुलासा केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या आम्हाला दिल्लीवर राज्य करायचे आहे. साउथ ब्लॉक, पंतप्रधान कुठे बसतात, गृहमंत्र्यांचे कार्यालय कुठे आहे. तिथे आपल्याला टप्याटप्याने पोहचायचे आहे. या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे अजित पवार यांना आम्ही सांगू की आमच्या लोकांचही ऐकत जा नाहीतर गडबड होईल.
नरेंद्र मोदी माझ्या घरासमोर राहतात
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राऊत म्हणाले, शिवसेनेची ओळख खूप मोठी आहे. ती दिल्लीच्या तख्तापर्यंत आहे. मी दिल्लीमध्ये राहतो. मला कोणी पत्ता विचारला तर मी सांगतो की नरेंद्र मोदी माझ्या घरासमोर राहतात. मी त्यांच्या घरासमोर राहतो असे मी कधी सांगत नाही. उलट तेच आता सांगतील की संजय राऊत यांच्या घरासमोर माझे घर आहे. कारण शिवसेनेची ओळख मोठी आहे.