पुणे/बिबवेवाडी –भाजप आमदार सुनील कांबळे यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या शिवीगाळीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यांच्या या कृत्याचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी कॉंग्रेसने रविवारी कांबळे यांच्या बिबवेवाडी येथील घराबाहेर आंदोलन केले.
यावेळी कांबळे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, नगरसेविका अश्विनी कदम, संतोष नांगरे, जयदेव इसवे, नितीन कदम, बाळासाहेब अटल आदी कार्यकर्ते सहभागी झाले. संबंधित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करावी आणि त्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच संबंधित महिला अधिकाऱ्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्तेप्रदीप देशमुख यांनी केली.
महिला अभियंत्याला शिवीगाळ करून आमदार कांबळे यांनी साऱ्या सीमा ओलांडल्या आहेत, या प्रकरणात कांबळे यांनी संबंधित महिला अभियंत्यांची तसेच समस्त महिलांची जाहीर माफी मागावी. आमदार कांबळे हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून आले आहेत. संघ-भाजपच्या चिखलात आमदार कांबळे यांच्यासारखी भाषा वापरणारी कमळेच उगवणार. कारण, त्यांची संस्कृतीच तशी आहे. ज्यांना शिवीगाळ करण्यात आली त्या महिला अधिकाऱ्यांनी आमदार कांबळे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. या प्रकरणात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस त्या महिला अभियंत्यांसोबत आहे.
– रूपाली चाकणकर, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस
या ऑडिओ क्लिपमधून भाजपची संस्कृती पुन्हा दिसली आहे. महिला अधिकाऱ्यांशी अशा भाषेत बोलणे योग्य नाहीच. भाजपकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. ठेकेदारासाठी महिलांना शिवीगाळ करणारे भाजपचे पदाधिकारी जनतेच्या हितासाठी काही करत नाहीत. या अगोदरही करोना काळात आरोग्य अधिकाऱ्यांना एका भाजप नगरसेवकाने अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत्यांनीही नुकतीच असभ्य भाषा वापरली होती. या घटनांवरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही; ही भाजपची संस्कृतीच आहे.
– दीपाळी धुमाळ, विरोधी पक्षनेत्या, मनपा
“तो मी नव्हेच’…
प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नसून, ही क्लिप बनावट आहे. याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. क्लिप आपण सविस्तर ऐकली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माझी बदनामी करण्याचे हे षड्यंत्र आहे. आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत आपण महिलांविषयी कोणतीही अपमानास्पद भाषा वापरली नाही. मतदारसंघात केलेल्या कामातील चूक विरोधकांना काढता आली नाही. तसेच मतदारसंघात केलेले काम विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याने अशाप्रकारे खोटी ऑडिओ क्लिप प्रसारित करून बदनाम करण्याचा डाव आखला आहे.
– सुनील कांबळे, आमदार