‘अटल भूजल योजने’तील कामांच्या गुणवत्तेसह दर्जावर विशेष लक्ष देण्याच्या अजित पवार यांच्या सूचना

पुणे – पुणे जिल्ह्यात ११८ गावात सुरु असणाऱ्या अटल भूजल योजनेतील कामांना गती देताना कामांचा दर्जा आणि गुणवत्ता यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्र पुरस्कृत ‘अटल भूजल योजने’त पुणे जिल्ह्यातील निवड झालेल्या 118 गावातील कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अटल भूजल योजनेच्या समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, भूजल सर्वेक्षणचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव बोटे तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या योजनेतील कामांसाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, तसेच जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील निवड झालेल्या 118 गावांमध्ये अशा पध्दतीने चांगली कामे करा की ज्याचे अनुकरण अन्य गावे करतील. या कामांसाठी ‘एनजीओ’ नेमताना कामाचा दर्जा चांगला राहील याकडे विशेष लक्ष द्या, समितीची बैठक दर तीन महिन्यांनी आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी प्रकल्पाची कार्यान्वयन पध्दती व वित्तीय साधन, भूजलासंबंधी माहिती व अहवाल जनसामान्यांकरीता खुले करणे, लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा तयार करणे, कार्यक्षम पाणी वापर पध्दतीचा अंगीकार करणे, भूजल पातळीतील घसरण दरामध्ये सुधारणा, योजनेंतर्गत आत्तापर्यंत करण्यात आलेली कामे आदींबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयामार्फत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.