मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाच्या बाबतीत काहीसे पिछाडीवर पडलेल्या अजित पवारांना सत्ताधारी शिवसेनेचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याची खुली ऑफर दिली आहे.अजित पवार एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे मत केसरकरांनी मांडले आहे.
केसरकर यावेळी म्हणाले, अजित पवारांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. ते एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा राज्यातील जनतेला फायदा झाला पाहिजे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यांच्यासोबत काय होत आहे, हे सर्वश्रूत आहे. तसेच पवार यांच्याविषयी मला खूप आदर आहे. ते विरोधी पक्षाचे जबाबदार नेते आहेत असं स्पष्ट मत यावेळी केसरकरांनी मांडलं.
संजय राऊतांसारखे लोक बोलतात तेव्हा जनता त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण अजित पवार बोलतात तेव्हा त्याकडे गांभीर्याने पाहिले जाते. त्यामुळे सामाजिक ऐक्य राखण्यासाठी ते आमच्यासोबत असतील याची मला खात्री आहे असंही केसरकर यावेळी म्हणाले.
अजित पवार राजकारणातील बच्चन
राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे केसरकरांनी अजित पवारांना दिलेल्या ऑफरवर म्हणाल्या, अमिताभ बच्चन हे सगळ्यांनाच सिनेमात हवे असतात. कारण सिनेमात त्यांचा आवाज चालतो, चेहरा चालतो, अभिनय चालतो, इतकेच काय त्यांची स्वाक्षरीही चालते. त्याचप्रमाणे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. ते सर्वांनाच हवे असतात. त्यात वाईट काय.