माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा घणाघात
सासवड (पुणे) – बारामती तालुक्यात रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन सिलिंडर्स मुबलक आहेत. पण बाकी तालुक्यामध्ये लोक तडफडून मरत आहेत. हे चित्र चांगले नाही. अजित पवार यांनी आपण बारामतीचे नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत याचे भान ठेवायला हवे, असा घणाघात माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे.
पांडे (सारोळा, ता. भोर) येथे गुंजवणी प्रकल्पाच्या जलवाहिनीच्या कामाला त्यांनी भेट दिली. तेव्हा तालुक्यातील करोनाच्या विषयावर ते बोलत होते. यावेळी सभापती नलिनी लोळे, माजी सभापती अतुल म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, सासवड शहरप्रमुख अभिजित जगताप, अर्चना जाधव, नगरसेवक सचिन भोंगळे, कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांच्यासह एल. अँड. टी. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विजय शिवतारे म्हणाले की, सासवडचा ठोक व किरकोळ बाजार दिवे क्रीडा संकुलाच्या जागेत हलवावा. नवीन प्रशासकीय इमारत, जेजुरी ग्रामीण रुग्णालय अशा ठिकाणी मिळून किमान 200 बेडचे कोविड सेंटर उभारावे. त्यात रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलिंडर्स, व्हेंटिलेटर्स यांची उपलब्धता करून द्यावी. सध्या अस्तित्वात असलेल्या सासवड, तक्रारवाडी आणि दिवे येथील कोविड सेंटर्स मध्ये रुग्णांचे संडास, बाथरूम, बेसिन यांच्या स्वच्छता राखण्यात याव्यात. त्यांना पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून द्यावे. कोविड सेंटरमध्ये असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांची नियमित तपासणी करत्वी, आशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
- आमदारांच्या हेकेखोरपणामुळे पुरंदरमध्ये भयावहस्थिती
देशाचा मृत्यदर दोन ते अडीच टक्क्यांच्या घरात असताना पुरंदर तालुक्याने 5.2 टक्के मृत्यूदर गाठून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. ही बाब भूषणावह नक्कीच नाही. संसर्गजन्य आजार पुढारी वाढवत नसतात. पण प्रशासनावर अंकुश ठेवून वेळोवेळी उपाययोजना करणे हे जबाबदार लोकप्रतिनिधीचे लक्षण आहे. पुरंदरचे आमदार ऑगस्ट उजाडेपर्यंत निवांत होते. त्यांना भविष्यातील धोका लक्षात आणून देऊनही केवळ हेकेखोरपणा केला गेला. त्याची किंमत आज पूर्ण तालुका मोजतोय. मी पत्राद्वारे अजित पवारांना काही तातडीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. आठवडाभरात परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर मी माझे आजारपण बाजूला ठेवून आंदोलन करणार आहे. तसे मुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनालाही कळविले असल्याचे विजय शिवतारे यांनी नमूद केले.