नवी दिल्ली, अमृतसर, चंदिगढ – वादग्रस्त कृषी विधेयकाच्या निषेधार्थ उत्तर भारतात निषेधाची जोरदार लाट उसळली आहे. पंजाब आणि हरियाणात जागोजागी रास्ता रोको करण्यात येत आहे. काही ठिकाणांहून नागरिक दिल्लीच्या दिशेने आंदोलनासाठी निघाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हरीयाणा आणि पंजाबच्या सीमेवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
पंजाब आणि हरियाणात गेले काही दिवस सुरू असणाऱ्या निदर्शनाची तीव्रता रविवारी वाढली. शेजारच्या राज्यात सुरू असणाऱ्या आंदोलनामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
गझीयापूर बाजूला राखीव पोलिसांच्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पंजाबात किसान आक्रोश
पंजाबमध्ये युवक कॉंग्रेसने दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर किसान आक्रोश मोर्चा काढला. ट्रॅक्टरची रॅली काढून केलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधेयकाच्या प्रतिकात्मक प्रतिमांचे दहन केले.
हरियाणात रस्ता रोखो
हरीयाणात भारतीय किसान संघाच्या हरियाणा शाखेने राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन केले. यमुनानगर जिल्ह्यात हजारो शेतकरी या विधेयकाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. भारतीय किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष गुरनामसिंह चरानी यांनी हे विधेयक जोपर्यंत मागे घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
अंबाला – हिसार महामामर्ग तीन तास रोखून धरण्यात आला. कुरूक्षेत्र जिल्ह्यात लडवा, करूक्षेत्र आणि शहबाद येथे शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरले. या भागात पोलिसांनी बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा उतरवला. मात्र, त्याला न जुमानता शेतकऱ्यांनी आंदोलन केलेच. कर्नाल, यमुनानगर आणि कैथाल येथेही शेतकऱ्यांनी रस्ते रोखून धरले.
भारतीय राष्ट्रीय लोकदलानेही हरियाणात आंदोलन केले. जननायक जनता पक्षाचे शाहबाद येथील आमदार रामकारण काला हेही आंदोलनात उतरले. शेतकऱ्यांच्या चिंता मी सरकारकडे मांडीन असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्षशी त्यांच्या पक्षाची युती असून ते सत्तेत आहेत.