पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पाडून काही सहकाऱ्यांसोबत शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यक्रमासाठी एकेकाळच्या बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (दि.25) जेसीबीमधून पुष्पवृष्टी, ढोल ताशाचा गजर आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात पवार यांचे स्वागत करण्यात आले. यानिमित्त शहर राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड हे दादांच्याच मागे असल्याचे शक्ती प्रदर्शानातून दाखवून दिले. रावेतमध्ये 550 किलोच्या हाराने स्वागत करण्यात आले.
रावेतमध्ये माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, वाल्हेकरवाडीत राजेश साळुंखे, चिंचवड येथील चापेकर चौकात भाऊसाहेब भोईर, चिंचवड स्टेशन काळूराम पवार आणि मोरवाडीत अक्षय माचरे यांच्याकडून स्वागत करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (दि.2) जुलैला सरकारमध्ये सहभागी झाले. पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये पवार पहिल्यांदाच आले होते. शहरातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यांच्या समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
उपमुख्यमंत्री पवार कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना म्हणाले, इथली माती आणि इथली माणसे माझीच आहेत. शहरात मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. सत्ता असू द्या, सत्ता नसू द्या शहरवासीयांनी मोठे प्रेम दिले. शहरवासियांच्या प्रेमाने आपण भारावून गेल्याचे ते म्हणाले.