पुणे – देशातील करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे देशभरात लसीकरण मोहिम वेगाने राबविण्यात येत आहे. पुण्यात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची माहिती, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच दोन लसीमधील अंतर कमी करण्यासंदर्भात त्यांनी मोठं विधान केलं.
अजित पवार आज, पुण्यात बोलत होते. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं. मात्र करोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसऱ्या डोसच्या नोंदणीसाठी अॅप 84 दिवस ओपन होत नाही. त्यामुळे दोन डोसमधील 84 दिवसांचं अंतर कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती कऱणार असल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं.
लसीकरणात असलेलं 84 दिवसांचं अंतर कमी केल्यामुळे पुढील काळात लसीकरण अधिक वेगाने होऊ शकतं. यावेळी अजित पवारांनी मास्कच्या वापरावर पुन्हा एकदा जोर दिला आहे. मास्क प्रत्येकाने वापरावेच, अशा सूचना त्यांनी केल्या.