कोल्हापूर- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देणारा निर्णय वार्षिक सभेत जाहीर केला. दुभत्या जनावराचा कोणत्याही आजाराने मृत्यू झालास एक लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी वार्षिक सभेत यासंबंधीची घोषणा केली. तसेच गोकुळच्या भविष्यातील विस्ताराच्या अनुषंगाने मुंबई व रायगड येथे दूध प्रकल्पासाठी जागा खरेदी व प्रकल्पाच्या अन्य कामासाठी ३२४ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला वार्षिक सभेने मान्यता दिली.
ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. कोरोना स्थितीमुळे यंदाची सभा ऑनलाइन घेण्यात आली. या सभेत विषयपत्रिकेवरील ११ विषयांना मंजुरी दिली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा झाली. दरम्यान ‘सभा ऑफलाइन पद्ध्रतीने घेऊन सभासदांच्या प्रश्नाला उत्तर देणे, त्यांच्या शंकेचे निरसन करणे आवडले असते. मात्र कोरोनामुळे सभेचे ऑनलाइन नियोजन करावे लागले. पुढील वर्षी नक्कीच सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये वार्षिक सभा घेऊ ’अशी ग्वाही चेअरमन पाटील यांनी सभेच्या प्रारंभीच दिली. सहकार क्षेत्रात दूध संकलनामध्ये गोकुळ हा राज्यामध्ये एक नंबर तर देशात सातव्या स्थानी आहे. लिक्वीड मिल्क मार्केटिंगमध्ये गोकुळ राज्यात एक नंबर तर देशात द्वितीय स्थानावर असल्याचे सांगितले. दूध उत्पादकांना दूध दर फरकांतर्गत दिवाळीनिमित्त एकत्रितपणे ८३ कोटी ८१ लाख इतकी रक्कम दिली जाणार आहे.
दरम्यान भोकरपाडा येथील सोळा एकर जागा गोकुळ दूध संघाला मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केल्याबद्दल मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांचा ‘गोकुळ’तर्फे सत्कार करण्यात आला. चेअरमन पाटील यांनी गोकुळच्या वाटचालीचा आढावा घेतला. गोकुळचा विस्तार करण्यासाठी रायगड व मुंबईतील जागा खरेदीचा निर्णय हा योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘गोकुळ’च्या योजनेविषयी बोलताना चेअरमन पाटील म्हणाले, ‘गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. गोकुळ व दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विमा योजना लागू करण्यात येणार आहे. दूध उत्पादकाने कोणत्याही बँकेकडून कर्ज घऊन दुभती जनावरे खरेदी केली असतील व त्या जनावराचे दूध गोकुळ दूध संघास येत असेल त्यांच्यासाठी विमा योजना असणार आहे. दुभते जनावर कोणत्याही आजाराने मृत्यूमुखी पडल्यास एक लाख इतकी विम्याची रक्कम मिळेल. विमा चालू झाल्यापासून दुभते जनावर पहिले पंधरा दिवस आजारी असू नये. सोळाव्या दिवसापासून पुढे एका वर्षाच्या कालावधीत कोणत्याही आजाराने जनावर मयत झाल्यास विमा दिला जाईल. दोन जनावरांची विमा रक्कम प्रत्येकी एक लाख इतीक राहिल. दोन लाख रुपयांचा वार्षिक विमा हप्ता ४५०० रुपये इतके आहे.’
कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी आभार मानले. याप्रसंगी संचालक शशिकांत पाटील चुयेकर, सुजित मिणचेकर, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, विरोधी गटाचे संचालक शौमिका महाडिक,बाळासाहेब खाडे, अंबरिश घाटगे, चेतन नरके आदी उपस्थित होते.
संघाची सांपत्तिक स्थिती :
६२२५ दूध संस्थामार्फत वर्षाला ४४ काटी ६२ लाख लिटर दूध संकलन
गोकुळ दूध संघाची वार्षिक उलाढाल: २५५१ कोटी
वसूल भाग भांडवल : ५४ कोटी ३९ लाख
सरकारपेक्षा दूध संघाचा दर जास्त, म्हैस दुधास प्रतिलिटर दोन रुपये साठ पैसे जादा दर
आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस
आनंदराव पाटील चुयेकरांच्या कार्यकर्तत्वावर चित्रफित बनविणार
‘गोकुळ दूध संघाची स्थापना १६ मार्च १९६३ रोजी झाली. सुरुवातील केवळ ७०० लिटर दूध संकलन व्हायचे. आज प्रतिदिन दुधाचे संकलन १४ लाख लिटरपर्यंत वाढले. गोकुळचे शिल्पकार आनंदराव पाटील चुयेकर यांनी लावलेल्या रोपटयाचा आज वटवृक्ष झाला आहे. आनंदराव पाटील यांनी गोकुळच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचावी, त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी गोकुळतर्फे त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘चित्रफित’ तयार करण्यात येणार आहे. संचालक मंडळाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे.