Ajeet Sharma Bhagalpur Congress Candidate: काँग्रेसने मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 11वी यादी जाहीर केली. या यादीत एकूण 17 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये बिहारमधील 3 उमेदवारांच्या नावांचाही समावेश आहे. अजित शर्मा यांना बिहारमधील भागलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. जाणून घेऊया कोण आहेत अजित शर्मा?
अजित शर्मा भागलपूरचे विद्यमान आमदार –
अजित शर्मा हे भागलपूरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. 2014, 2015 आणि 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत ते भागलपूरमधून विजयी झाले आहेत. ते बिहार विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यांची मुलगी नेहा शर्मा ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने क्रुक, तुम बिन 2, यमला पगला दीवाना 2, तान्हाजी आणि जोगीरा सरारारा… सारख्या चित्रपटात काम केले आहे.
याआधी नेहा शर्मा या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, मात्र अजित स्वत: त्यावर दावा करत होते. अजित शर्मा यांची या जागेवर चांगली पकड आहे. गेल्या वेळी या जागेवर जेडीयूचे नेते अजय कुमार मंडल विजयी झाले होते. त्यांनी आरजेडीचे शैलेश कुमार यांचा पराभव केला. अजित कुमार मैदानात उतरल्याने सामना खूपच रंजक होणार आहे.
कन्हैया कुमारला धक्का –
अजित शर्मा यांच्या नावाची घोषणा होताच कन्हैया कुमार यांना धक्का बसला आहे. वास्तविक कन्हैया कुमारचे नाव भागलपूरमधून चर्चेत होते. भागलपूरमधून काँग्रेस कन्हैया कुमारला उमेदवारी देऊ शकते, असे बोलले जात होते. मात्र, आता काँग्रेसने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
काँग्रेसने कन्हैया कुमारला अद्याप एकाही जागेवरून तिकीट दिलेले नाही. इंडिया आघाडी अंतर्गत काँग्रेस बिहारमधील 9 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामध्ये भागलपूर तसेच किशनगंज, कटिहार, महाराजगंज, पटना साहिब, सासाराम, मुझफ्फरपूर, पश्चिम चंपारण आणि समस्तीपूर या जागांचा समावेश आहे.