नोव्हेंबर 2021 मध्ये एअरबसचे ए340 हे विमान अंटार्टिकावरील धावपट्टीवर उतरले. जेट प्रकारातील विमान अंटार्टिकावर उतरण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे आता अंटार्टिकावर जाण्यासाठी हवाई प्रवास अधिक सुकर होऊन जास्तीत जास्त लोकांना या बर्फाच्छादित खंडावर जाण्याची संधी मिळू शकते.
दक्षिण ध्रुवावर विमान प्रवास करून जाण्याचा दीर्घकाळचा इतिहास असला तरी बहुतेकवेळा ती विमाने छोट्या आकाराची होती. प्रथमच ए340 जातीचे जेट विमान अंटार्टिकावरील धावपट्टीवर यशस्वीपणे उतरल्याने आता हवाई वाहतूक क्षेत्राला नवा आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे.
खरे तर पृथ्वीवरील सहाही खंडातील देशांमध्ये विमानांची कायम ये-जा सुरु असते. अगदी वाळवंटी प्रदेश, समुद्रातील दूरवरची बेटे आणि टुंड्रा प्रदेशाशी सगळे देश विमानसेवेने जोडलेले आहेत. मात्र सातव्या खंडावर म्हणजेच अंटार्टिकावर पोचणे विमानांसाठी आव्हानात्मक आणि धाडसाचे राहिलेले आहे.
अंटार्टिंकावर कायम बर्फवृष्टी, हिमवादळे, सतत हवामानात मोठी चढउतार अनुभवायला येत असल्याने याठिकाणी पृथ्वीवरील सर्वात कमी लोकवस्ती आहे. त्यातील बहुतेक संशोधनासाठी गेलेले असतात. उन्हाळ्यात साधारणपणे साडेचार हजार तर हिवाळ्यात जेमतेम एक हजार लोक या विशाल खंडावर राहायला असतात. याठिकाणी अनेक देशांनी कायमस्वरुपी संशोधन केंद्रे आणि पर्यटकांसाठी छावण्या उभारलेल्या असल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी नियमितपणे मालवाहतूक जेट विमाने ये-जा करत असतात.
2 नोव्हेंबर 2021 मध्ये मात्र एअरबसचे ए340 हे प्रवासी जेट विमान याठिकाणी असणाऱ्या धावपट्टीवर उतरले. या विमानाने दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊनहून उड्डाण करून 2500 नॉटीकल मैलांचा (2877 मैल) प्रवास करून ते अंटार्टिकावर साडेपाच तासात पोचले.
हे जेट विमान पोर्तुगालमधील हाय फ्लाय कंपनीचे असून वुल्फ्स फँग या धाडसी पर्यटक कँपने ते भाड्याने घेतले होते. दक्षिण ध्रुवावरील त्यांच्या छावणीसाठी या विमानातून जीवनावश्यक वस्तू आणण्यात आल्या. केपटाऊनहून अंटार्टिका आणि परत केपटाऊनला जाण्याइतपत इंधन या विमानात होते.
अंटार्टिकावर 1928 पासून विमाने येण्यास सुरवात झाली. त्यावर्षी अंटार्टिकाजवळील बेट समूहातील डिसेप्शन आयलंडवरून ऑस्ट्रेलियाच्या लष्करातील पायलट जॉर्ज ह्युबर्ट विल्किन्सने उड्डाण करून तो अंटार्टिकावर फेरी मारून आला होता. त्याच्याबरोबर सहपायलट कार्ल बेन आयल्सन होता. त्यावेळी एक हजार मैलांचे अंतर पार करण्यासाठी त्यांना साडेचार तासांचा वेळ लागला होता.
अमेरिकेच्या नौदल आणि हवाईदलातील सैनिकांनी जानेवारी 1929 मध्ये हवाई दलाची तीन विमाने घेऊन लिटिल अमेरिका नावाने नौदल तळ उभारण्याच्या नावाखाली अंटार्टिकावरून प्रवास केला.
1955 मध्ये अमेरिकी नौदलाने नॅशनल सायन्स फौंडेशनअंतर्गत अंटार्टिकावरील हवामान, समुद्री जीवन आणि बर्फाळ प्रदेशातील निसर्गाची यंत्रणा यांचा अभ्यास करण्यासाठी ऑपरेशन डीप फ्रीज आयोजित केले होते. त्यावेळी अंटार्टिकावरील बर्फावर विमान उतरवण्यात अमेरिकेच्या नौदलाला पहिल्यांदा यश आले. तोपर्यंत अनेकांना याठिकाणी विमान उतरवणे अशक्य वाटत होते. त्यावेळी अमेरिकेच्या डग्लस स्कायट्रेन या विमानाची चाके प्रथमच दक्षिण ध्रुवाला लागली.
त्यानंतर अनेक छोटी विमाने अंटार्टिकावर उतरली आणि परत गेली. परंतु नोव्हेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा येथे बांधण्यात आलेल्या 3000 मीटर लांबीच्या धावपट्टीवर प्रवासी जेट विमान उतरवण्यात आले. त्यासाठी विमानाचे ब्रेक सहजपणे लागावेत आणि विमान उतरताना सूर्यप्रकाशामुळे बर्फ चमकल्याने अडचणी येऊ नयेत यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.
त्या विमानाचे वैमानिक कार्लोस मिरपुरी यांच्या मते त्याठिकाणी बर्फाची चमक तीव्र असते. त्यासाठी योग्य त्या आयवेअरचा उपयोग केल्यामुळे बाहेरील दृश्य आणि केबिनमधील उपकरणे नीट दिसण्यास मदत होते.