लंडन – अंटार्टिकातील बर्फाळ प्रदेश हा नेहमीच हवामानाच्या दृष्टिकोनातून आव्हानाचा भाग असतो. या प्रदेशात अद्याप विमान वाहतुकीचा विचार करण्यात आला नव्हता; पण आता तीनशे प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असलेल्या बोईंग 787 विमानाने नुकतेच अंटार्टिकाच्या धावपट्टीवर उतरण्याचा पराक्रम केला आहे.
नॉर्वेतील काही शास्त्रज्ञांच्या चमूला घेऊन हे विमान अंटार्टिकात उतरले आहे. अंटार्टिकाच्या बर्फाळ प्रदेशात विमानाने येण्याची ही पहिलीच घटना मानण्यात येत आहे. अंटार्टिकातील ट्रोल येथील धावपट्टीवर हे विमान उतरवण्यात आले असून नॉर्वेजीयन पोलर इन्स्टिट्यूटचे 45 शास्त्रज्ञ या विमानातून अंटार्टिकाच्या जमिनीवर उतरले. या विमानातून प्रवाशांव्यतिरिक्त तब्बल 12 टन वजनाचे संशोधन मटेरियल ही आणण्यात आले होते.
अंटार्टिकात संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याची माहिती संस्थेच्या संचालक एमिली बरके यांनी दिली. ट्रोल विमानतळावरील धावपट्टी 3000 मीटर लांब असून ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी चालू राहणार आहे.
अंटार्टिकावर सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असल्याने मार्चमध्ये जेव्हा 6 महिन्यासाठी सूर्यास्त होईल तेव्हा या विमानतळाचे काम बंद केले जाईल. या धावपट्टीवरून व्यापारी प्रकारची वाहतूक सुरू केली जाणार आहे की नाही याबाबत अद्याप काही सांगण्यात आले नसले तरी कोणत्याही सर्वसाधारण विमानतळाप्रमाणे या विमानतळावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.