“सफर’च्या अहवालानुसार हवेची गुणवत्ता सध्या “मध्यम’ पातळीवर
पुणे – शहरात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधी हवेची गुणवत्ता “उत्तम’ असून, हवेतील प्रदूषण घटकांचे प्रमाण अतिशय कमी झाल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र, आता हवेची गुणवत्ता “उत्तम’ न राहता पूर्वीप्रमाणे प्रदूषित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवेच्या प्रदूषणाने पुन्हा “शंभरी’ गाठल्याचे दिसून आले आहे. आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हे अतिशय घातक असल्याची भीती अभ्यासक व्यक्त करत आहेत.
लॉकडाऊन काळात वाहतूक आणि उद्योगांवरील बंदीमुळे शहरातील वाहतूक जवळपास बंदच होती. त्यामुळे हवा प्रदूषणही कमालीचे घटले होते. 100 ते 130 मेट्रिक घनमीटर दरम्यान असलेले प्रदूषित घटकांचे प्रमाण अगदी 6 ते 8 मेट्रिक घनमीटर इतक्या प्रमाणात खालावले होते. विशेषत: पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) हा घटक आश्चर्यकारकरित्या कमी झाला होता.
पर्यावरणाच्या दृष्टीने ही एक दुर्मीळ आणि सकारात्मक घटना मानली गेली. या कालावधीत नोंदवली गेलेली हवा प्रदूषणाची नोंद हे प्रमाण मर्यादा मानली जावी, अशी मागणीदेखील अनेक अभ्यासक करत आहेत.
मात्र, सप्टेंबरनंतर अनलॉक प्रक्रियेमुळे उद्योग आणि वाहतुकीवरील बंदीचे नियम शिथिल झाले. यामुळे शहरातील वाहतुकीमध्ये हळूहळू वाढ होत आहे. साहजिकपणे त्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवरही होत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून हवेतील प्रदूषित घटकांच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. “सफर’ संस्थेने घेतलेल्या नोंदीनुसार हवेची गुणवत्ता सध्या “मध्यम’ पातळीवर असून, दीर्घकाळ अशा हवेच्या संपर्कात आल्यास श्वसनाचा त्रास होऊ शकतो, असे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.