नागपूर – भारतीय हवाईदलाने आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले असून हवाईदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्णपणे स्वदेशी स्वयंचलित ट्रॅकिंग प्रणाली विकसित केल्याची माहिती एयर मार्शल विभास पांडे (एयर ऑफिसर कमांडिंग इन चीफ -एओसी-इन-सी) यांनी गुरुवारी दिली आहे.
स्वदेशी स्वयंचलित ट्रॅकिंग प्रणाली उपग्रहाशी जोडलेली असून युद्ध काळात तसेच अन्यवेळी उड्डाण केल्यावर विमानाचे नेमके स्थान यामुळे कळेल. याची अनेक ठिकाणी चाचणी सुरू आहे. आता फक्त ईस्टर्न सेंटरला ट्रायल राहिली आहे. ती झाली की येत्या सप्टेंबरमध्ये हवाईदलात स्वदेशी स्वयंचलित ट्रॅकिंग प्रणालीचा उपयोग सुरू होईल असेही पांडे यांनी यावेळी सांगितले.
हवाईदलात असलेली रशियन बनावटीची सुखोई तसेच मीग-21 विमाने खूप जूनी झाली आहे. या विमानांच्या देखभाल दुरूस्तीवर खूप खर्च होतो हेही खरे आहे. पण म्हणून या विमानांना एकदम बाद करता येणार नाही. टप्प्याटप्प्याने सर्व विमाने बदलली जातील असेही पांडेंनी सांगितले. याचाच दाखला देताना ते पुढे म्हणाले, यासाठीच 83 एलसीए विमानांचा करार करण्यात आला आहे.
सध्या तरी राफेलची देखभाल दुरूस्ती मेंटेनन्स कमांडकडे घेण्याचा कोणताही विचार नाही. मेंटेनन्स कमांडमध्ये कृत्रीम बुद्धीमत्तेचा उपयोग विदा संकलन, विश्लेषण तसेच वैद्यकीय सेवेत करता येऊ शकतो का? हे तपासून पाहाता येईल. भविष्यात आर्मी व नेव्हीच्या विमानांची देखभाल दुरूस्ती आमच्याकडे घेऊ शकतो, असे सूचक वक्तव्यही पांडे यांनी केले.
आत्मनिर्भर होणे ही निरंतर प्रक्रिया
आत्मनिर्भर होणे ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे ती टक्केवारीत सांगता येणारी नाही. पण, एकेक करून टप्प्याटप्प्याने स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल सुरू आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये “सी-295′ या 56 मालवाहु विमानांचा करार स्पेनसोबत झाला. त्यातील चार विमाने येत्या सप्टेंबरमध्ये हवाई दलाला मिळणार आहे.
आणखी 12 टप्प्याटप्प्याने मिळतील. पण यातील 40 मालवाहु विमानांची निर्मिती गुजरातमधील वडोदरा येथे टाल कंपनी करणार आहे. तसेच, संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेसाठी खासगी सहभाग आवश्यक आहे. खासगी उद्योगांना दूर लोटून आपण स्वयंपूर्ण होऊ शकत नाही.
खासगी सहभागातूनच स्वयंपूर्ण होऊन संपूर्ण प्रगती होऊ शकते. आपल्याला आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी होण्यासाठी वेगवेगळ्या घटकांत विस्तार करावा लागेल असेही पांडेंनी अखेरीस म्हटले.