नगर (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा बाळगणारा आरोपी नगर तालुका हद्दीतून ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे असा ३३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
शहाजी निवृत्ती जाधव (वय ३९, रा. राजेगाव, ता. केज, जि. बीड, हल्ली रा. हॉटेल निसर्ग, वाटेफळ, ता. जि. नगर), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस मयुर दीपक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नगर तालुक्यातील वडगाव तांदळी शिवारात हाॅटेल निसर्ग या ठिकाणी वावरत असलेल्या व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीशीर माहितीमिळाली.
त्यानुसार गुन्हे शोध पथकास सूचना करून आरोपीस ताब्यात घेण्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतला.ही कारवाई गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, रवींद्र कर्डिले, मयुर दीपक गायकवाड, विशाल आण्णासाहेब तनपुरे, संतोष खैरे यांच्या पथकाने कारवाई केली.