पाथर्डी – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी महिनाभरापासून सुरू केलेल्या युवा संवाद अभियानाचा येत्या सोमवारी 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथे समारोप होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महारूद्र किर्तने व युवक शहराध्यक्ष देवा पवार यांनी दिली.
ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील महाविद्यालयात जात महाविद्यालयीन तरुण- तरुणींशी संवाद साधला. महाराष्ट्रातील व देशातील आजची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती आणि त्याचा भविष्यात होणारे परिणाम या सर्व घडामोडीमुळे आजचे विद्यार्थी जेव्हा व्यावसायिक जीवनात पदार्पन करतील, त्यावेळी त्यांचेसमोरील संभाव्य समस्यांचा उहापोह ढाकणे यांनी महिन्याभरात केला.
आज वाढती बेरोजगारी, शासकीय नोकर भरतीतील सावळा गोंधळ यामुळे तरुण व तरुणींमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली दिसते. याच सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी ॲड.प्रतापराव ढाकणे दोन्ही तालुक्यातील जवळपास चाळीस महाविद्यालयातील हजारो विद्यार्थांशी संवाद साधला. याला प्रचंड प्रतिसाद लाभला. या अभियानाच्या समारोपासाठी व तरुणांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांचे मार्गदर्शन पाथर्डी शहरातील ओपन थिएटर येथे सोमवारी 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता युवा महासंवाद समारोप सोहळा आयोजित करण्यात आला . सर्वांनी यासाठी उपस्थित रहावे, असे अवाहन शेवटी किर्तने व पवार यांनी केले.