नेवासा – नेवासा तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्ता कामांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून नागरिकांना रस्त्याअभावी प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या होत्या. शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गंत तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा निधी रस्ता कामासाठी खर्च करून रस्त्याचा हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावलेला आहे. त्यामुळे येथील जनतेला आता दळणवळणाचा प्रमुख मार्ग सुकर झाला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले.
खासदार लोखंडे यांच्याहस्ते नागापूर (ता.नेवासा) येथील सौंदाळा – रांजणगाव ते नागापूर या २ कोटी १५ लाख २९ हजार रुपये रस्ता कामांचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, जिल्हा उपप्रमुख भगवानराव गंगावणे, तालुकाप्रमुख संजय पवार, सुरेशराव डिके, भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, नागापूरच्या सरपंच सुजाता कापसे, उपसरपंच अंजना आढागळे, शिवसेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख मिरा गुंजाळ, अॅड. बी.एस.काळे, अॅड. कैलास कापसे, संदिप कापसे, दिनकर गर्जे, शिवाजी पाठक आदी उपस्थित होते.
खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की,संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढा पुकारून आंदोलन सुरु केलेले असताना दसरा मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितलेले होते. आज मराठा समाजाच्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. सरकारने दिलेला शब्द खरा ठरविल्यामुळे सरकार आणि जरांगे पाटील या सर्वांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. यावेळी शिवसेनेचे सुदाम कापसे, अॅड.दिपक चक्रणारायण, बाबासाहेब नवथर,भाकड यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.