औंध – पाषाण येथील सूस रस्त्यावर महापालिकेतर्फे मोठे रस्ते, पदपथ तसेच सायकल ट्रॅकही तयार करण्यात आले. परंतु, पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला सायकल ट्रॅक बिनकामाचा ठरत आहे. याचा वापर पार्किंग तसेच पानटपऱ्या, खाद्य पदार्थांचे स्टाल लावण्यासाठी केला जात आहे.
पाषाण येथील सूस रस्त्यावर बालाजी चौकापासून ते सूसखिंडीपर्यंत सायकल ट्रॅक बनवण्यात येत आहे. परंतु, हा सायकल ट्रॅक अखंड नसल्यामुळे तुकड्या तुकड्यात बनवण्यात आलेल्या या सायकल ट्रॅकचा वापर सायकल स्वारांना करता येत नाही. सायकल ट्रॅकवर जाण्यासाठी कोणत्याही ठिकाणी मार्गच ठेवण्यात आलेलानाही, अनेक ठिकाणी सलगता नाही, बहुतांशी ठिकाणी काम अपूर्णच आहे. याउलट याचा वापर पथारी व्यवसायिक करीत आहेत. अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकचा वापर दुचाकीस्वार पार्किंग म्हणून करीत आहेत. सायकल ट्रॅकचे काम पालिकेकडून केवळ निधी खर्च करण्यासाठी केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मोकळ्या मैदानात ट्रॅकची गरज…
पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. परंतु, आता सायकलींची संख्या कमी होऊन दुचाकींची संख्या वाढली आहे. त्यामुळे, मोकळ्या मैदानावर व्यायामासाठी सायकल ट्रॅक तयार करण्यात आला असता तर त्याचा उपयोग व्यायामासाठी सायकलींग करण्यासाठी झाला असता परंतु, रस्त्यालगत ट्रॅक उभारण्यात येत असल्याने रस्ता अरूंद झाला असून याचा उपयोग अन्य कामांसाठीच होत आहे.
“पाषाण-सूस रस्ता विकसित करताना स्थानिक नागरिकांची मते जाणून घेणे गरजेचे होते. गरज नसतानाही सायकल ट्रॅक करण्यात आले आहेत. यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. याचा वापर पार्किंगसाठीच अधिक होत आहे.” – अंजू बाली, स्थानिक नागरिक