सोनइ – ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची नाळ समजल्या जाणाऱ्या सोसायटी या फ़क्त कर्ज वाटप व वसुली यावर न थांबता शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय सुरू करून संधी उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन तालुका सहायक निबंधक डी.ए.घोड़ेचोर यांनी केले.
श्री क्षेत्र देवगड़ देवस्थान (ता. नेवासा) येथे महाराष्ट्र राज्य सहकारी, संघ, पुणे संचलित सहकार प्रशिक्षण नगर व सहायक निबंधक सहकारी संस्था, नेवासा यांच्या संयुक्त सहकार्याने विविध सेवा सहकारी संस्थेचे एकदिवसीय सचिव सहकार प्रशिक्षण आयोजित केले होते. नगर सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य ए. डी. तोतरे यांनी प्रास्तविक केले. अकोला येथील जिल्हा बॅंकचे व्यवस्थापक आर. एस. बोडखे यांनी सहकारी कायद्यातील महत्वाच्या तरतुदी, उपविधी यांचे मार्गदर्शन केले. पुणे येथील व्याख्याते सुनील शेठे यांनी पंतप्रधान योजनेअंतर्गत योजना, व्यवसायवाढ़ आदीबाबत सविस्तर माहिती दिली. तालुका सचिव आप्पासाहेब बोर्डे व ए. डी. तोतरे यांनी मान्यवरांचा सन्मान केला.