कोपरगाव (प्रतिनिधी) – माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी शिर्डी येथील द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट देऊन वृद्ध निराधारांसमवेत दिवाळी साजरी केली. एकीकडे झगमगाट असणाऱ्या दुनियेत कौटुंबिक ओलव्याचा प्रकाश धूसर झाल्याचे चित्र असताना मात्र ज्येष्ठ नागरीकांना वेळ देऊन कोल्हे यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे.
ज्येष्ठ लोककलावंत शांताबाई कोपरगावकर यांच्या दुर्लक्षित आयुष्याला आधार देण्याच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या द्वारकामाई वृद्धाश्रमात कोल्हे यांच्या अनेकदा सदिच्छा भेटी होत असतात. या प्रसंगी संवाद साधताना त्या म्हणाल्या साईबाबांच्या आशीर्वादाची भूमी असणाऱ्या शिर्डीचे पवित्र स्थान तुमच्या जीवनात सुखाचे क्षण देणारे आहे. ही वाटचाल आनंद आणि सबुरीने सुरू ठेवावी व चिंतामुक्त जीवन जगावे.
तुम्ही खचून जाऊ नका, हे आश्रम आणि व्यवस्थापन तुमच्या जिवनात कसलीही उणीव भासू देणारे नाही. अतिशय उत्तम सुविधा आणि सेवा मिळतात त्यामुळे वृध्दाश्रम न मानता हे एक कुटुंब आहे असे वातावरण आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद हीच खरी पाठीशी असणारी ताकद आहे. दिपावलीचा प्रकाश तुमच्या जिवनात सुख समृध्दी घेऊन येवो आणि उत्तम आरोग्य तुम्हाला लाभावे अशी प्रार्थना कोल्हे यांनी व्यक्त केली.