सातारा (प्रतिनिधी) –दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आरळे (ता. सातारा) येथील व्यापाऱ्याला पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या रयत क्रांती संघटनेचा जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव (सध्या रा. कोयना सोसायटी, सदरबझार, सातारा, मूळ रा. कोरेगाव) व त्याचा सहकारी हणमंत बाबूराव साबळे (रा. शिवथर ता. सातारा) यांच्याविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरळे येथील व्यापाऱ्याची पत्नी योगिता प्रसन्न राजमाने (वय 35) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव व त्याचा सहकारी हणमंत साबळे हे वारंवार तुमच्या दुकानातील बोगस मालाची तक्रार बाजार समितीत करतो, अशी धमकी देत होते. त्यासाठी पाच लाखांची मागणीही करत होते. त्यांना पैसे देण्यास पतीने विरोध केला होता. पुन्हा 2022 मध्ये पैशांची मागणी केली. पन्नास हजार रुपयांची मागणी मधुकर साबळे यांना ऑनलाइन केली. तेव्हा त्यांच्या पतीने दहा हजार रुपये पाठवले होते. त्यानंतर काही महिन्यांपासून असे पुन्हा मधुकर जाधव व हणमंत घरी साबळे पुन्हा पाच लाखांची मला मागणी करत होते.
दरम्यान, आता दि. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पती प्रसन्ना यांच्या मोबाइलवर बाजार समितीचे सचिव मोरे यांचा फोन आला. तुमच्याविरुद्ध मधुकर जाधव यांनी तक्रार केलेली आहे. तुम्ही येथे या, असा त्यांचा फोन आल्याने माझे पती दुपारी अडीच वाजता सातारच्या बाजार समितीमध्ये गेले. तेथे सचिव मोरे यांना भेटले. तेव्हा तुम्ही खरेदी विक्री केलेल्या असे मालांच्या पावत्यांवर व्यवस्थित सह्या करा असे मोरे यांनी माझ्या पतींना सांगितले. त्यानंतर मधुकर जाधव व हणमंत साबळे हे दोघेही तेथे आले. त्यावेळी त्या दोघांनी पैसे मागितले. मात्र, त्यांना मी पैसे देऊ शकत नाही म्हणून ते तेथून निघून आले व झाला प्रकार त्यांनी सांगितला.
त्यानंतर दि. 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मधुकर जाधव व हणमंत साबळे आमच्या दुकानासमोर आले. त्यांनी दारुच्या नशेत शिवीगाळ करत तुम्ही ग्राहकांना फसवता, तुम्ही दुकान कसे चालविता बघतो, असे म्हणून धमकी दिली. त्यावेळी त्या दोघांचा आरडाओरडा ऐकून गावातील अरविंद दिनकर कदम, अतुल कदम, पंकज हणमंत पवार, दीपक ज्ञानदेव वाघमळे, अक्षय चंद्रकांत शिंदे तेथे आल्याने मधुकर जाधव व हणमंत साबळे दोघे त्यांच्या मोटारसायकलवरून तेथून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.पोलीस शिपाई गोरे तपास करत आहेत.