कोपरगाव – स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यूहमध्ये महाविद्यालयातील 176 विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा.(डॉ.) एस.आर.पगारे यांनी दिली.
यामध्ये एपिक सर्व्हिसेस पुणे व फिनड्राईव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपन्यांचा समावेश आहे. या निवडीचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेपूर्वीच आपली नियुक्ती पत्रेही कंपनीच्या वतीने सुपूर्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेच्या समाप्तीनंतर नियुक्त झालेल्या पदावर रुजू व्हायचे आहे. अशी निवड झालेले हे तालुक्यातील एकमेव महाविद्यालय आहे. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील तृतीय वर्षातील विविध विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. प्लेसमेंट विभागातून निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीपराव रोहमारे, प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून रोजगार प्राप्त करून देण्यामध्ये महाविद्यालयाचा प्लेसमेंट विभाग सतत अग्रेसर असतो