आंबेगाव पूर्व भागात वळसे पाटील यांचा पाहणी दौरा
जनावरांसाठी चारा देण्याबाबत शेतक-यांची मागणी
मंचर – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात अवकाळी पावसाने गारपीट झाल्यामुळे जनावरांसाठी पिकवलेल्या चारा पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा, अशी मागणी पूर्व भागातील वडगावपीर, मांदळेवाडी, लोणी धामणी, पोंदेवाडी येथील शेतकऱ्यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील पूर्व भागातील वडगावपीर, मांदळेवाडी, वाळुंजवाडी, पोंदेवाडी, लोणी धामणी परिसरात रविवारी (दि. २७) सायंकाळी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जनावरांसाठी असलेल्या ज्वारी, मका, कडवळ, गवत या चारा पिकांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.
भुईसपाट झालेली चारा पिके पावसामुळे खराब झाली असून, ही पिके जनावरे खात नाहीत. जनावरांना विकत चारा घेणे परवडत नाही, त्यात दुधाला भाव नाही, त्यामुळे या भागात चारा छावणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
या नुकसानग्रस्त भागाची पाहणी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली असता परिस्थिती जाणून घेतली यावेळी त्यांनी उपस्थित असलेले प्रांतअधिकारी गोविंद शिंदे , तहसीलदार संजय नागटिळक , कृषी अधिकारी यांना जनावरांची गणना करून जनावरांच्या साऱ्या संदर्भात योग्य त्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट पीक पाहणी करून पंचनामे करावे व तात्काळ मदत करावी. अशी मागणी केली आहे.