पाथर्डी – तालुक्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीला गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून ग्रामसेवक नसून त्वरित ग्रामसेवक मिळावा, या मागणीसाठी सरपंच भावना अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली गट विकास अधिकारी यांच्या दालनात संभळ आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, उपाध्यक्ष अंकुश चितळे, प्रा.सुनील पाखरे, शिवसेनेचे पोपट पालवे, नारायण शेकडे, महेश शिरसाट, तुषार महाजन, आकाश शिरसाट, सुधीर महाजन, शहराम फुंदे, संजय घुले, मंगेश राठोड, अंकुश शिरसाट, संदिप शिरसाट, विष्णु शेकडे हे आंदोलनकर्ते उपस्थित होते.
गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून शिरसटवाडी गावाला ग्रामसेवक नसल्याने गावातील विकासाची कामे रखडली गेली आहेत. ग्रामस्थांनाही दैनंदिन शासकीय कामकाजासाठी ग्रामपंचायतचे लागणारे कागदपत्र हे ग्रामसेवक मार्फत मिळतात. ग्रामसेवक नसल्याने ती कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने छोट्या-मोठया शासकीय कामाबरोबर लोकांच्या वैयक्तिक योजनांचा लाभ मिळत नसून त्यापासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागत आहे. याचा कुठेतरी प्रशासनाने विचार करावा. आम्हाला संघर्ष करायला लावू नका, आमच्या गावाला ग्रामसेवक द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली.
गटविकास अधिकारी जगदीश पालवे व मनसेचे अविनाश पालवे यांच्यासह ग्रामस्थांची जोरदार खडाजंगी झाली. वारंवार ग्रामपंचायतीला ग्रामसेवक मिळावा, ही मागणी आम्ही करतो, मात्र मिळत नाही. गटविकास अधिकाऱ्यांचा वचक प्रशासनावर नाही, त्यामुळे प्रशासन सुस्त आहे. गावाला ग्रामसेवक द्यायचा नाही, याबाबत तुम्हाला कोणाचा दबाव आहे का? असाही आरोप अविनाश पालवे यांनी करून चांगलेच खडे बोल सुनावले. २६ डिसेंबरपर्यंत आपणास ग्रामसेवक दिला जाईल, असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे यांनी दिल्यानंतर ग्रामस्थानी आंदोलन मागे घेतले. दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास मी माझ्या मुलाबाळासह संपूर्ण कुटुंब पंचायत समिती समोर अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे पालवे म्हणाले.