पुणे – महापालिका आयुक्तांकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकाचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पुढील वर्षभरासाठी कोणतीही करवाढ केली जाणार नसल्याची माहिती मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे सलग सातव्या वर्षी पुणेकरांना करवाढीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
दुसऱ्या बाजूला होस्टेल, वसतिगृह ,पेइंग गेस्टससाठी वापर होत असलेल्या मिळकतींना निवासीऐवजी व्यावसायिक दराने कर आकारणी केली जाणार आहे. अशा मिळकतींची ४० टक्के सवलतही जाणार असून त्यांना व्यावसायिकदराने कर भरावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयुक्तांकडून प्रशासक म्हणून करवाढीचा धोरणात्मक निर्णय घेतल्यास त्याचे राजकीय पडसादही उमटण्याची भीती आहे.
लोकसभा निवडणुका एप्रिलदरम्यान होणार आहेत. महापालिकेच्या नियमानुसार कोणतीही करवाढ करायची असल्यास त्यासाठी २० फेब्रुवारीपूर्वी मान्यता घेऊन या करवाढीचा समावेश स्थायी समितीत सादर करायच्या अंदाजपत्रकात करावा लागतो. तर, या अंदाजपत्रकास ३१ मार्चपूर्वी मुख्यसभेची मान्यता घ्यावी लागते. मात्र, फेब्रुवारीच्या अखेरीस आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने आयुक्तांकडून यंदा त्यापूर्वीच अंदाजपत्रक मान्य केले जाणार आहे. अंदाजपत्रकासाठी सर्व विभागांच्या जमा- खर्च तसेच पुढील प्रस्तावित खर्चाचा आढावा घेतला जात आहे.