पारनेर – पारनेर तालुका पत्रकार संघ व पारनेर महाविद्यालय, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ व ६ जानेवारी रोजी पारनेर महाविद्यालयात राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पुस्तक प्रदर्शन व विक्री केंद्राचे आयोजन केले आहे. यावेळी पारनेर सार्वजनिक वाचनालय व महाविद्यालय ग्रंथालय दुर्मिळ ग्रंथ पुस्तक प्रेमींच्या भेटीला आणणार आहेत.
शुक्रवार दि. ५ रोजी सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडीने युवा साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे .पानीपतकार साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते मुख्य उद्घाटन सोहळा होईल. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पारनेर महाविद्यालयात संपन्न होत असलेल्या युवा साहित्य संमेलनात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
यावेळी पारनेर सार्वजनिक वाचनालय व महाविद्यालय ग्रंथालय आपल्याजवळील दुर्मिळ ग्रंथ वाचकांना पाहण्यासाठी ठेवणार आहेत. तसेच पुणे येथील भाबड बंधूचे साहित्य नगरी पुस्तक प्रदर्शन व विक्री, ललित प्रकाशन, नगर, सांकेत प्रकाशन छत्रपती संभाजी नगर, छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर, पुणे शाखा व आबासाहेब केदारे शिरुर हे दर्जेदार पुस्तके विक्रीसाठी ठेवणार आहेत.